"माझी यशवंत भेट एक प्रेरणादायी आत्मकथन"                                  
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
 
     
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
 
 
     
 
   
   
     
     
       

       
        माझी यशवंत भेट एक प्रेरणादायी आत्मकथन!!        
       
       
         

                   

         

         

         

         

         

         

             

       
       
        long.jpg        
लेखक-व्याख्याते श्री.सुरेश रेपाळ. Mo/WP:8884980230        
       
                   
                   
       
       
                 
     

   👇 ll शुभ दिवस ll 👇

                   

    मित्रांनो, आज मी तुम्हांला माझ्या शालेय जीवनात ऐकलेली आणि त्याच संदर्भात मी स्वत: अविस्मरणीय अनुभव घेतलेली एका हुषार आणि प्रतिभासंपन्न विद्यार्थ्याची अदभुत कहाणी सांगणार आहे. या सत्यघटनेचं मी केलेलं हे आत्मकथन आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा माझा ठाम विश्वास आहे.              माझे नाव: सुरेश माणिकराव रेपाळ. माझे जन्मगाव: कराड. जिल्हा: सातारा.( महाराष्ट्र ) माझी जन्म तारीख: 6 जानेवारी 1963. आता आम्ही इचलकरंजी येथे स्थायिक आहोत. माझे हायस्कूलचे शिक्षण कराड येथील " टिळक हायस्कूल " या नामांकीत हायस्कूलमध्ये झाले. लहानपणापासून माझ्यात " जिज्ञासु वृत्ती " थोडी अधिकच होती आणि आजही तशीच आहे. आमचे मोठे काका (पापा) आणि माझे वडील ( आप्पा ) असे एकत्रित 12 मुले आणि 5 घरची मोठी मंडळी असे 17 माणसांचे मोठे कुटुंब होते. रविवार पेठेत आमचे एक मजली घर होते. तसेच शनिवार पेठेत होलसेल साडीचे दुकान होते. तळमजल्यावर काका रहायचे तर आम्ही वर पहील्या मजल्यावर रहात असू. रोज शाळा सुटल्यावर मी धावतच घरी येई कारण मला आईला कधी एकदा भेटेन असे व्हायचे.घरी पोचताच माडीवरुन पळत जात असतांना मी नेहमी आईला हाक देत असे, " आई-माता-जननी...मी आलो..आई-माता-जननी.. मी आलो..." आई धावत येऊन मला जवळ घ्यायची... " शाळा सुटली बाळाची " असं म्हणायची. वयाच्या चौथ्या वर्षी आईच्या मांडीवर बसून पाहीलेला पहिला चित्रपट मला आजही आठवतो..त्या चित्रपटाचं नाव होतं - बालक ! या चित्रपटात " विद्यार्थी पत्रलेखन स्पर्धेनिमित्त "  एका लहान विद्यार्थ्यानं गांधीजींना उद्देशून लिहीलेले पत्र  शाळेच्या स्टेजवरून गाण्याच्या स्वरूपात खूप छान सादर केलं होतं ते गाणं आजही मला आठवतं,  " सुनले बापू ए पैगाम..मेरी चिठ्ठी तेरे नाम, चिठ्ठीमे सबसे पहले..लिखता तुझको राम- राम, लिखता तुझको राम-राम..." या प्रसंगापासूनच कदाचित माझ्या भावविश्वात मराठी तसेच हिंदी भाषेतील हृदयस्पर्शी गीतांनी प्रवेश केला असावा. सकाळी आंघोळ करताना मी अगदी तल्लीन होऊन   दिलखुलासपणे गाणी गुणगुणत असे.  आणखी एक प्रसंग सांगतो आणि मुख्य विषयाकडे वळतो. इयत्ता दुसरी किंवा तिसरीत असेन, मी कधी-कधी वडीलांच्या बरोबर सकाळी-सकाळी सायकलवरून दत्त मंदिरात जायचो.अर्थातच मंदिरात जाता-येता आप्पांना मी अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत असे.असेच एके दिवशी दत्त मंदिरात जात असतांना मी आप्पांना एक प्रश्न विचारला , " आप्पा , मला एकच काका आहेत. पेठेतील प्रत्येक दुकानदाराला तुमच्या सारखा एकच भाव असतो का? " आप्पा हसले आणि म्हणाले , " ते कसं शक्य आहे? " मी म्हणालो अहो आप्पा बघा ना..प्रत्येक दुकानात " एकच भाव " अशी पाटी लावली आहे !!" माझे बोलणे ऐकून आप्पा अगदी मनसोक्त हसले अर्थात माझ्या बालिश प्रश्नाचे उत्तर आप्पांच्याकडून ऐकल्यावर मलाही हसू आवरले नाही.खरंच लहानपण किती रम्य अन् स्वप्नवत असतं ना? लहानपणीच्या या निरागस आठवणींची पार्श्वभूमी ही माझ्या आत्मकथनाचा एक प्रकारे पाया आहे.कारण यातूनच माझी ही जिज्ञासा माझ्या पुढील आयुष्यात घडलेल्या अविस्मरणीय प्रसंगांची जननी होती हे सिद्ध होते !!                                टिळक हायस्कूल , कराड. ही माझी प्राणप्रिय शाळा !! या विद्यामंदिरातून जडणघडण होऊन पुढे आपल्या कर्तृत्वाने जगभर नाव कमावलेले अनेक महापुरूष मी पाहिले , ऐकले. यातील, राजकीय क्षेत्र जीवनात सेवाव्रत म्हणून स्विकारलेल्या सुसंस्कृत, प्रज्ञावंत , निस्वार्थी अशा एका थोर महापुरूषाशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचे परमभाग्य मला लाभले. हाच या आत्मकथनाचा मुख्य विषय आहे.                    मी 1975 साली इयत्ता सहावी उत्तीर्ण होऊन सातवीत गेलो. शाळेचा पहिला दिवस ! आम्ही सर्व विद्यार्थी शिक्षकांची वाट पहात वर्गात बसलो होतो. काही वेळाने आमचे शिक्षक वर्गात आले. आम्ही सर्व विद्यार्थी उभे राहिलो. सरांनी बसायला सांगितले आणि म्हणाले,   " माझं नाव एम. बी.जोशी. आजपासून मी तुमचा वर्गशिक्षक आहे. आज पहील्यांदा आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. दुपारी सुटी राहील. उद्यापासून नियमित वर्ग चालू होतील, तर प्रत्येकानं उभं राहून आपलं नाव सांगा आणि मोठं झाल्यावर कोण होणार हे पण सांगा." आम्ही सर्व विद्यार्थी एकमेकांकडे पाहू लागलो आणि म्हणालो, " सर, आम्ही आता तर सातवीत आलो आहोत.आम्ही नाव सांगतो पण मोठं झाल्यावर कोण व्हायचं हे अजून आम्ही ठरवलं नाही ." सर म्हणाले, " तुमचं अगदी बरोबर आहे, पण हे सांगण्यामागे एक अतिशय महत्वाचा उद्देश आहे .या ज्या वर्गात आता तुम्ही बसलेला आहात ना? इथं पूर्वी शाळेच्या पहील्या दिवशी एक अदभुत घटना घडली होती. आज  या शाळेतील प्रत्येक वर्गात प्रत्येक शिक्षक ती घटना सांगत असतील. तुम्ही  सर्वजण खूप भाग्यवान आहात कारण ज्या वर्गात ही अदभुत घटना घडली होती त्याच वर्गात आता तूम्ही बसलेला आहात.फरक इतकाच आहे की त्यावेळी बसायला बैठक व्यवस्था होती. आता तुम्हाला बेंच  आहेत. तुम्ही असं करा तुमचे वडील काही नोकरी - व्यवसाय करत असतील तर तेच तुमचे ध्येय आहे असे समजून तुम्ही आता मला सांगा, नंतर मी तुम्हांला ती अदभुत घटना सांगतो. माझ्या वडीलांचे साडीचे दुकान होते म्हणून मी कापड व्यापारी होणार असे सांगायचे ठरविले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय सांगितले. माझा नंबर आल्यावर मी सांगितलं, "सर माझं नाव सुरेश माणिकराव रेपाळ आणि मी मोठा झाल्यावर कापड व्यापारी होणार." सर म्हणाले, " का तुमचं दूकान आहे? " मी म्हणालो, " होय सर आमचं दुकान इथे शनिवार पेठेत आहे."  सर्व विद्यार्थ्यांनी आपले ध्येय सांगितले. जसे डाॅकटर , वकील, इंजिनिअर , व्यापारी, उद्योगपती...जीवनात जी कांही क्षेत्रं आहेत तीच सांगणार, ती सोडून दुसरं काय सांगणार? सरांनी सर्वांची उत्तरे ऐकली आणि म्हणाले , " मी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्हां सर्वांची ध्येयपूर्ती होण्यासाठी तुम्हांला तशी सदबुद्धी लाभू देत!!" सरांनी सर्वांना शुभाशिर्वाद दिला आणि सरांनी ती अदभुत घटना सांगावयास सुरुवात केली.... उत्सुकतेने भारलेली आमची मने जीवाचा कान करून ऐकू लागली... "विद्यार्थी मित्रांनो आपली "टिळक हायस्कूल" ही शाळा खूप नावाजलेली शाळा आहे , आणि विशेष म्हणजे ऐतिहासिक आहे. लोकमान्य टिळकांचं निधन झालं 1920 साली. त्याच साली कराडच्या कांही मोठ्या लोकांनी एकत्र येऊन टिळकांच्या नावानं या हायस्कूलची स्थापना केली. "टिळक हायस्कूल, कराड. स्थापना 1920". आणि ही जी अदभुत घटना घडली ती त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 1930 साली. आता ऐका...1930 साल, शाळेचा पहिला दिवस. तुम्ही बसलेला हाच तो सातवीचा वर्ग.त्यावेळचे शिक्षक त्यांचं नाव दुवेदी सर. धोतर - कोट असा पेहराव.ते या वर्गात आले. सर्व विद्यार्थी उभे राहिले, सर त्यांना बसा म्हणाले.त्यांनी विद्यार्थ्यांना असंच सांगितलं की, " माझं नाव दुवेदी.आजपासून मी तुमचा वर्ग शिक्षक आहे. आज आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. दुपारी सुटी राहील. उद्यापासून नियमित वर्ग चालू होतील. प्रत्येकानं उभं राहून आपलं नाव सांगा आणि मोठं झाल्यावर कोण होणार हे पण सांगा ." त्यावेळी एक आश्चर्य घडलं ते म्हणजे , त्यावेळी सर्वच विद्यार्थी काहीही आढेवेढे न घेता, मोठं झाल्यावर कोण होणार हे सांगायला लगेच तयार झाले! याचं कारण तो स्वातंत्र्यपूर्व ( 1930 ) काळ  होता. प्रत्येकाच्या मनात एक असीम उत्साह होता. अवकाशाला गवसणी घालण्याची मनात उमेद होती, भरारी होती..मग एकेक विद्यार्थी उभे राहून आपलं नाव आणि आपलं ध्येय सांगू लागला...                                             पहीला विद्यार्थी उभा राहिला त्याने सांगितले, सर माझे नाव...आणि मी मोठा झाल्यावर कलेक्टर होणार, मग दुसर्या विद्यार्थ्याने आपले नाव सांगून मी सरपंच  होणार असल्याचे सांगितले , मग तिसरा..चौथा..पाचवा विद्यार्थी...एक रांग संपली आणि दुसरी रांग चालू झाली... दुसर्या रांगेत मधोमध, चेहर्यावर सात्विक भाव असलेला, अतिशय शांत पण स्वतःची ओळख करून देत असतांना भावुक झालेला मुलगा बसला होता, तो उभा राहिला, उभा राहिल्यावर त्याचा कंठ दाटला होता आणि डोळे पाणावले होते, वर्गात तो इकडे-तिकडे बघत होता. सरांनी त्याला विचारले, " काय बाळ तुझं नाव?" तो म्हणाला , "हां सांगतो, सर माझं नाव यशवंत बळवंत चव्हाण..." असं सांगून तो शांत बसला. पुन्हा सरांनी विचारलं , " बाळ तू सांगितलं नाहीस, तू मोठा झाल्यावर कोण होणार? " मग क्षणार्धातच सरांच्याकडे मोठ्या आत्मविश्वासाने पहात , हाताची घडी घालत कोणालाही कुतूहल वाटावे असे उत्तर त्याने दिले तो म्हणाला, " सर माझं नाव यशवंत बळवंत चव्हाण आणि मोठा झाल्यावर, मी यशवंतराव चव्हाण होणार !!!" त्याचे हे उत्तर ऐकताच दुवेदी सर अचंबित झाले... या मुलात इतर विद्यार्थ्यांपेक्षा काही विशेष गुण आहेत हे ओळखून ते त्याला म्हणाले,  "यशवंता...तुझं उत्तर मला खूप आवडलं रे...हा तास संपल्यावर तू टिचर रूममध्ये येशील का?"  यशवंताने चटकन होकार दिला.                                तास संपताच दुवेदी सर विचार करीत-करीत टिचर रूममध्ये पोचले. त्यावेळी टिचर रूममध्ये एक गादी, एक डेस्क आणि एक तिजोरी अशी व्यवस्था होती. तिथे कांही शिक्षक अगोदर येऊन बसले होते. त्यातील एका शिक्षकांनी सहज विचारलं, " काय दुवेदी सर, झाली का ओळखपरेड?" त्यावर दुवेदी सर म्हणाले,  " झाली, पण एका विद्यार्थ्यांनं अदभुत उत्तर दिलं हो...मी त्याला आता इथं बोलावलं आहे. " तोपर्यंत टिचररूमच्या दाराच्या चौकटीला यशवंत येऊन उभा राहिला. गादीवर बसलेले एक-दोन शिक्षक त्याला ओळखत होते. ते म्हणाले, " अरे, हा तर यशवंत आहे.ये आत.काय उत्तर दिलंस सांग पाहू? "  यशवंताने टिचररूममध्ये प्रवेश केला. त्याचा चेहरा मघासारखाच गंभीर आणि डोळे पाणावलेले होते. दुवेदी सरानी त्याच्याकडे क्षणभर पाहीलं आणि म्हणाले, " मी सांगतो, बाकीच्या विद्यार्थ्यांनी पटपट उत्तरे दिली , कोण म्हणे कलेक्टर होणार तर कोण म्हणे सरपंच होणार...हा पहील्यापासूनच गंभीर आहे , हा म्हणे, " माझं नाव यशवंत बळवंत चव्हाण आणि मोठा झाल्यावर मी यशवंतराव चव्हाण होणार !!" गादीवर बसलेल्या सर्वच शिक्षकांना त्याच्या या उत्तराचे खूप- खूप कौतुक वाटले. मोठ्या कुतूहलाने शाबासकी देत त्यांनी यशवंताला बसायला सांगितले. यशवंत डेस्कच्या पलिकडे बसला. मग दुवेदी सरांनी त्याच्या पाठीवर हात फिरवित त्याला धीर दिला. आणि म्हणाले , " हे बघ यशवंत , तुझं उत्तर मला आणि या सर्व शिक्षकांना खूपच आवडलं आहे. आता खरं सांग, तू हे उत्तर मगाशी बाकीचे विद्यार्थी ओळीनं उत्तरं देत असताना असं मनात पक्क ठरवून दिलंस की यामागं दुसरं काही कारण आहे?" " दुसरं काही कारण आहे? " हे सरांचे शब्द ऐकताच  यशवंताचा मघापासून दाटून आलेला कंठ फुटला. तो घळाघळा रडू लागला. क्षणार्धात त्याने स्वतःला सावरले आणि त्याने जे सांगितले ते ऐका, उगीच माणसं मोठी होत नाहीत.                यशवंत सांगू लागला... " सर , कराडला शुक्रवार पेठेत शंकरराव बटाणे यांचं घर आहे. त्यांच्या घरी मी , माझी आई आणि माझे थोरले बंधू असे तिघेजण भाड्यानं रहातो. माझे वडील लहानपणीच वारले.माझी आई आणि बंधू शेतावर मजूरी करतात. या दोघांच्या जीवावर माझं हे शिक्षण चालू आहे .आपल्या शाळेची वेळ आहे अकराची. बरोबर साडेदहा वाजता मी आणि माझी आई घराबाहेर पडतो. आईला कामाला जायचं असतं आणि मला इथं यायचं असतं. रोज घराबाहेर पडलो की आई माझा हात आपल्या हातात घट्ट धरते, आजही तीनं तो तसाच धरला होता. ती म्हणते, "यशवंता तू लई शहाणा हाईस..बुद्धीमान हाईस.. मोठा झालास की डाक्टर , वकील नक्की हुशील पण त्येनं फक्त आपल्या कुळाचा उद्धार हुईल.आपल्या शेजारी-पाजारीपण आशी पोरं हायीत ज्यांच्याकडं बुद्धी हाय पण शिकायला पैसा न्हाय. तू त्येंच्यासाठी कायतरी कर,  तू डाक्टर-वकीलापेक्षा मोठा माणूस हुशील !! म्हणून सर मी मनाशी ठरवलंय, मोठा झाल्यावर मी घराबाहेर पडलो की लोकांनी ते डाॅक्टर चव्हाण गेले..ते वकील चव्हाण गेले..असं म्हणण्यापेक्षा सामाजिक काम करणारे यशवंतराव चव्हाण गेले असं म्हटलेलं मला आवडेल!!!" असं म्हटल्या-म्हटल्या गादीवरचे सगळे शिक्षक उठले , त्यांनी यशवंताची पाठ थोपटली.आणि दुवेदी सरांनी लगेच डेस्क उघडून त्यातून एक वही काढली आणि तीमध्ये हा सर्व प्रसंग लिहून काढला. दुवेदी सरांनी निश्चित ओळखलं होतं की हा मुलगा भविष्यात एक थोर व्यक्ती म्हणून जगात नाव कमावणार !! यशवंताचे अलौकिक विचार लिहिलेली ती अनमोल वही विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आजही टिळक हायस्कूल येथे जतन करून ठेवली आहे !! तसेच टिळक हायस्कूलमध्ये यशवंतरावांचा अर्धपुतळा आहे, तीत लिहीले आहे...भारताचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण. आणि त्याखाली लिहीले आहे..."मी यशवंतराव चव्हाण होणार-1930."                   मित्रहो , खूपच स्फूर्तीदायी आणि अदभुत वाटलीना ही घटना? पण ही तर फक्त सुरुवात होती, माझ्या आत्मकथनाचा हा पूर्वार्ध होता.माझ्या आत्मकथनाचा आत्मा हा उत्तरार्धात आहे !! कारण याच घटनेच्या प्रेरणेतून माझ्या जीवनात याच संदर्भात दुसरी अदभुत घटना घडली जिच्यामुळे मी माझ्या आयुष्यातील संघर्षमय काळातही ठाम उभे राहून पुन्हा यशाकडे झेप घेतली.या अदभुत आणि उत्कंठावर्धक उत्तरार्धाचा आरंभ  करीत असतांना आजही माझ्या अंगावर स्फूर्तीदायी आनंदाचे शहारे येत आहेत...1975 साली मी सातवीत असताना वरील  घटना श्री. एम.बी.जोशी सरांच्याकडून आम्ही वर्गात ऐकली.ज्यावेळी ही घटना सर आम्हांला सांगत होते त्यावेळी एका क्षणी मी भावनावश होऊन रडू लागलो.टेबलवर माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या मित्राने माझा हात धरून मला शांत केले त्याचं नाव ईश्वर चेतनदास चंदवानी. सरांनी ती घटना सांगितली आणि तो तास संपला, शाळा सुटली.  वर्गाबाहेर येताच माझे विचारचक्र सुरू झाले. यशवंतराव चव्हाण !! आपल्या कराडचा मुलगा !! भारताचा संरक्षणमंत्री !!! जन्मजात अलौकिक बुद्धीमत्ता लाभलेला, पण त्याच्या बालपणी एवढ्या हालअपेष्टा का आल्या? देव एवढी कठोर परीक्षा का घेतो चांगल्या माणसांची? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधीत मी जड पावलांनी घरी पोचलो. माडीवरुन जात असतांना मी दबलेल्या आवाजात आईला हाक देत होतो , " आई-माता-जननी...मी आलो...मी आलो...मी आलो... " माझ्या कातरलेल्या आवाजातील हळवा स्वर ऐकताच माझी आई धावत आली...मला कुशीत घेऊन तीनं माझ्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली , " सुरेश...बाळा काय झालं? तुला बरं आहे ना? आईनं कुशीत घेताच मला हुंदका आवरला नाही. मी म्हणालो , " आई बरं आहे मला, पण देव एवढी कठोर परीक्षा का घेतो गं एखाद्या चांगल्या माणसाची?" मी आईला शाळेत ऐकलेला यशवंतरावांच्या लहानपणीचा सर्व प्रसंग सांगितला. माझे डोळे पुशीतच तीनं मला समजावलं ,  "रडू नकोस रे माझ्या बाळा, तुला माहिती आहे ना? टाकीचं घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही!  तू पण त्यांच्यासारखा मोठा माणूस हो." आईच्या बोलण्यानं मला थोडा धीर आला तरीही मी आतून विचारांच्या वादळात अडकलो होतोच.                      पुढील चार दिवस माझ्या मनात अशीच अस्वस्थता पसरलेली होती. जून महिना, बाहेर पावसाची बारीक संततधार चालू होती अशा रिमझिम वातावरणातच पाचव्या दिवशी पहाटे सहा वाजता गणिताचा आणि सकाळी सात वाजता इंग्रजीचा असे दोन क्लास करून सकाळी साडेदहाला शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलो ते मनात एक ठाम निश्चय करूनच! घरापासून मेनरोडकडे वळताना बँक ऑफ कराड  (आताची बँक ऑफ इंडिया) लागते तिथे रोजच्या प्रमाणे  थिएटर मधील सिनेमाच्या प्रदर्शनाची जाहिरात करणारा टांगा थांबला होता. " शोर " या मनोजकुमारच्या गाजलेल्या चित्रपटाचे पोस्टर टांग्यावर झळकत होते. आणि बाजूला लावलेल्या लाऊडस्पीकरमधून एक स्फूर्तीदायी गाणे ऐकू येत होते..."जीवन चलनेका नाम, चलते रहो सुबह और शाम, के रस्ता  कटजाएँगा मितरा..." हे गाणे ऐकून माझ्या अस्वस्थ मनाला थोडी उभारी आली. आणि टांग्यात बसलेल्या  माणसाने दिलेली चित्रपटाची जाहिरात खिशात घालून मी शाळेत पोचलो.शाळा चालू  झाली, मी गंभीरच होतो. माझ्या मनातील अदभुत कल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा तो प्रारंभ होता!! जीवनात काहीतरी अविस्मरणीय आणि अपूर्व अशी घटना घडणार होती. आईचा आशिर्वाद माझं मनोबल वाढवत होता.  मी दुपारच्या सुटीची वाट पहात होतो. आणि कांही क्षणांत शाळेची घंटा वाजली.  दुपारी दोन वाजता जेवणाची सुटी झाली.ज्यांनी आम्हांला यशवंतरावांची कहाणी सांगितली होती त्या श्री.एम.बी.जोशी सरांचा तास दुपारी तीन वाजता होता. तो तास संपताच सर वर्गाबाहेर गेले आणि लगेच मी सरांच्या मागे धावत गेलो आणि त्यांना हाक दिली , " सर मला आपल्याला कांही सांगायचं आहे." सरांनी मागे वळून पाहिलं आणि माझ्याकडे येऊन म्हणाले ," काय रे... का बोलावलसं?" मी म्हणालो , " सर , परवा तुम्ही शाळेच्या पहिल्या दिवशी यशवंतरावांची कहाणी सांगितली. ती मला खूप-खूप आवडली." सर म्हणाले ," अरे वा ! छान छान !! " मी पुन्हा निश्चयी स्वरात सरांना म्हणालो , " सर मला आणखी एक सांगायचं आहे. मला आयुष्यात एकदा यशवंतरावांना भेटायचं आहे आणि त्यांचा आशिर्वाद घ्यायचा आहे त्यासाठी काय करायचं?" सरांना माझी इच्छा ऐकून खूपच कौतुक वाटले ते म्हणाले, " तू परवा काय नाव सांगितलं होतं?" मी म्हणालो , " सुरेश माणिकराव रेपाळ " मग सर म्हणाले , " हा..हा..ते कापड व्यापारी. सुरेश तू यशवंरावांना नक्की भेटू शकशील." मी म्हणालो, " सर तुम्ही लगेचच नक्की कसे म्हणत आहात?" माझ्या खांद्यावर  हात थोपटीत सर म्हणाले, " त्याचं असं आहे सुरेश, ही कहाणी मी गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांना सांगतो आहे. पण यशवंतरावांच्या भेटीची , त्यांच्या आशिर्वादाची जीवापाड ओढ वाटणारा तू पहीलाच विद्यार्थी मला भेटला आहेस याचा मला खूप आनंद होत आहे !!" मी उत्सुकतेनं  म्हणालो, " मग कशी भेट घ्यायची सांगा ना ..." सर म्हणाले, " आता पुढील तासानंतर शाळा सुटली की तू पण टिचररूममध्ये ये.मी तुला यशवंतरावांच्या भेटीचा एक निश्चित मार्ग सांगतो."                                              आनंदाच्या भरात नकळत एक छोटीशी उडी मारून मी वर्गात पोचलो. थोड्या वेळाने शाळा सुटली अन् मी धावतच टिचररूममध्ये पोचलो. सर माझी वाट पहात थांबले होते. त्यांनी लगेच कपाटातील एक कागद काढून मला दिला आणि  म्हणाले, " हा यशवंतरावांचा दिल्लीचा पत्ता आहे. " मी तो वाचला , "मा.गृहमंत्री यशवंतराव चव्हाण, 1, रेसकोर्स रोड, नवी दिल्ली. पिनकोड: 110003 असा तो पत्ता होता. मग सर म्हणाले , "सुरेश आता तू घरी गेलास की वडिलांना उद्या पोस्टातून एक जोडपत्र आणायला सांग. दोन पत्रे एकत्र जोडलेली असतात त्यातील एका पत्रावर तू तुझ्या आता ज्या भावना दाटून आल्या आहेत त्या तू तुझ्या हस्ताक्षरात लिही.आणि दुसरं जोडलेलं "जवाबी" असं लिहीलेलं पत्र ते त्यांच्या उत्तरासाठी कोरं ठेव. लिखित पत्रावर त्यांचा आणि जोडलेल्या कोर्या पत्रावर तुझा पत्ता लिहून ते पत्र त्यांना पाठव." मी थोडसं गंभीर होत सरांना म्हणालो, "सर, माझ्या पत्राचे उत्तर ते देतील ना?" सर म्हणाले, "हो. नक्की देतील.पण पत्रातील भावना तुझ्याच शब्दांत तूच लिहीलेल्या पाहीजेत." मी लगेच म्हणालो, "पण सर , हे उत्तर आल्यावर मी त्यांना भेटायचं कसं?" सर थोडे हसले आणि म्हणाले, " या पत्राचं उत्तर आलं की लगेच दुसरं पत्र लिहू नको कारण ते खूपच बिझी असतात. नंतर केंव्हातरी दोन-चार महिन्यांनी एखाद्या महात्म्याच्या जयंतीचं किंवा एखाद्या सणाचं निमित्त साधून तू दुसरं पत्र लिही, ते उत्तर आलं की मग तिसरं पत्र लिही असं करीत तू यशवंतरावांशी पत्रमैत्री कर.एक दिवस एक क्षण असा येईल की तू त्यावेळी या शाळेचा विद्यार्थी नसशील, तुझे शिक्षण वगैरे पूर्ण झालेले असेल, तू कुठेतरी नोकरी-व्यवसाय करीत असशील, त्या दिवशी तुला यशवंतरावांचे अपाँइंटमेंट लेटर येईल !! असे सांगून सर थोडे स्तब्ध झाले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवीत भावूक होत म्हणाले, " सुरेश, ज्या दिवशी असे लेटर तुला येईल ना , त्यावेळी माझी एक इच्छा आहे ",  मी म्हणालो, " काय सर ?"  सर म्हणाले, " सुरेश, त्या वेळी तू माझी आठवण काढ!! "  सरांचे हे निश्चयी बोलणे ऐकून मी भारावलेल्या मनाने सरांच्या पायाला स्पर्श केला. आणि  सरांचा आशिर्वाद घेऊन टिचररूमच्या बाहेर येताच सरांनी दिलेला पत्ता पुन्हा पाहण्यासाठी खिशात हात घालतांना मला खिशात सकाळी मिळालेली " शोर " चित्रपटाची जाहिरात दिसली आणि मनातल्या मनात सकाळी ऐकलेले गाणे गुणगुणत माझी पाऊले आनंदाने घराच्या दिशेने धावू लागली... "  जीवन चलनेका नाम , चलते रहो सुबह-शाम...के रस्ता कटजायेगा मितराँ..."  माझ्या आनंदाने भारलेल्या मनात सारखा विचार येत होता, " खरंच हे जीवन किती सुंदर आहे!! देवा मी तुझा खूप- खूप आभारी आहे!!                          घरी पोचताच आनंदाच्या भरात मी जिन्याच्या एकाचवेळी तीन-तीन पायरी चढत " आई-माता-जननी...मी आलो.." या एकाच हाकेत माडीवर कधी पोचलो हे मलाच कळले नाही, माझ्या उंचीचा असाही फायदा होत होता! आणि कधी-कधी त्राससुध्दा... उंची अधिक आणि शरीराने हडकुळा असल्यामुळे आमच्या गल्लीतला एक वात्रट मुलगा मला नेहमी उपरोधीकपणे " टांगा" अशी हाक मारीत असे, त्याचा मला खूप राग येई. असो. धावत आल्यामुळे मोठ्याने श्वास घेतच मी खिशातला पत्ता लिहीलेला कागद आईच्या हाती ठेवला आणि आईला म्हणालो , " आई...आई...हे बघ सरांनी मला कोणाचा पत्ता दिला आहे !! पत्ता वाचताच आई आनंदाने म्हणाली, " सुरेश, आता कधीतरी तू नक्कीच यशवंतरावांना भेटणार !!" मी म्हणालो, " होय आई" मग मी सरांनी भेटीविषयी केलेले मार्गदर्शन आईला अतिशय उत्साहाने सांगितले. आईने ते सर्व शांतपणे ऐकले आणि म्हणाली, "आता तू चहा पिऊन दुकानात जा आणि त्यांना( वडिलांना ) हे सगळं सांग. " मी जीवनात कांहीतरी विशेष केल्याच्या आनंदात दुकानात पोचलो. पैशाची लाकडी पेटी ठेवलेल्या पुढील गादीवर आप्पा बसले होते व पलिकडच्या गादीवर पापा बसले होते. मी स्मितहास्य करीतच आप्पांच्या शेजारी बसलो. आप्पा म्हणाले , " सुरेश, शाळा सुटली?" मी म्हणालो, " हो." मग लगेचच मी आप्पांना सांगितले, " आप्पा, उद्या मला पोस्टातून एक जोडपत्र आणा." हे ऐकताच आप्पा-पापा दोघांनीही माझ्याकडे  आश्चर्याने पाहीले. आप्पा म्हणाले, " सुरेश तू कोणाला पत्र लिहीणार आहेस?"  मी म्हणालो, " यशवंतराव चव्हाणांना! " हे ऐकताच आप्पा-पापा दोघेही एकदम आश्चर्यमिश्रित कौतुकाने जोराने हसले. आप्पा म्हणाले, " सुरेश कमाल आहे तुझी !! यशवंतराव चव्हाणांना तू पत्र लिहीणार आहेस !!! त्यांचा पत्ता आहे का तुझ्याकडे? " मी लगेच खिशातील पत्ता असलेला कागद त्यांच्या हाती दिला. पत्ता पहाताच आप्पा हसतच म्हणाले, " अरे, खरंच की !! छान-छान !! पण तुला हे सगळं सुचलं कसं? " मग मी त्यांना शाळेतील सरांनी सांगितलेली सर्व हकीकत सांगितली.यशवंतरावांची लहानपणीची जडणघडण माहिती असूनसुध्दा ती पुन्हा माझ्याकडून ऐकल्यावर, आप्पा आणि पापा दोघेही भारावले होते. आमच्या दुकानाच्या चौकटीवर तीन फोटो लावले होते, लक्ष्मी-सरस्वती-गणपती, महात्मा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांचा गालावर बोट ठेवलेला, पिवळे जाकेट घातलेला, विचारमग्न असा त्या काळातील प्रसिद्ध फोटो होता आणि त्या फोटोखाली लिहिलेलं एक ठळक अक्षरातील वाक्य दाखवित आप्पा म्हणाले, " तुझी या थोर व्यक्तीला भेटण्याची इच्छा आहे. 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले त्यावेळी यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते परंतु, आक्रमणाच्या गंभीर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी यशवंतरावांना दिली.त्यावेळी मुंबईहून दिल्लीला  जात असताना त्यांची मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर भव्य निरोपाची सभा झाली. त्या सभेत त्यांनी काढलेले अजरामर उद्गार फोटोखाली लिहीले आहेत - " हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्रीचा काळा पत्थर आपल्या छातीचा कोट करून या देशाचे रक्षण करील !"                    पापा म्हणाले, " तूझा निश्चय असाच ठाम राहूदे. एकदिवस तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल." मग आप्पा - पापा दोघांनीही आशिर्वाद दिला. नंतर  यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी आप्पांनी  छान माहिती दिली त्या माहितीने माझी यशवंतरावांना भेटण्याची इच्छा अधिक तीव्र झाली. आप्पा म्हणाले, " उद्या जोडपत्र आणून ठेवतो तू येऊन घेऊन जा." त्या नंतर काही वेळ दुकानात यशवंतरावांच्या फोटोकडे एकटक बघत बसून राहिलो आणि पुन्हा अशा स्फूर्तीदायी विचारांच्या भरातच मी घरी पोचलो. घरी प्रत्येक खोलीत भिंतीत बसविलेली लाकडी कपाटे होती आणि त्या कपाटांच्या दारांना उभे आरसे होते. मी नेहमी कधी कांही वेगळे ऐकले किंवा पाहीले की पुढच्या खोलीत कोणी नाही याची खात्री करून मग मी तिथल्या कपाटाच्या आरशासमोर ऊभे राहून त्या दिवशी विशेष वाटलेल्या व्यक्तींची, त्यांच्या आवाजाची नक्कल करीत असे. आणि हे घरातील सर्वांनाच माहिती होते ! आजही दुकानातून घरी पोचताच आपोआप माझी पाऊले  पहिल्या खोलीकडे वळली आणि मी कपाटाच्या आरशासमोर उभे राहून गालावर बोट ठेवून यशवंतरावांना स्वतःमध्ये पाहू लागलो ! आरशातील माझेच प्रतिबिंब यशवंतरावांच्या रूपाने माझ्या तन-मन-हृदय आणि आत्म्यावर कोरले गेले होते!!                 ".... प्रभातकाळी निसर्गराजा उजेडात न्हाला... म॔गल ऐका ...मंगल देखा...मंगलमय बोला...रवी आला हो रवी आला..." पहाटे-पहाटे  रेडिओवरील श्री.सुधीर  फडके यांच्या मधुर स्वरातील गीताने एका नवीन दिवसाचा मंगलमय प्रारंभ झाला. हा आरंभ होता माझ्या कराडच्या एका थोर नेत्याशी पत्रसंवाद साधण्याचा !! दिवसभर मन प्रसन्न होते. शाळा सुटताच दप्तर घरी ठेवले आणि अगदी धावतच दुकानात गेलो. आप्पा -पापांनी माझे हसतमुखाने जणू स्वागतच केले ! आणि आप्पा लगेच पैशाच्या पेटीत ठेवलेले जोडपत्र काढून देत मला म्हणाले, " हे घे पत्र, इथं गादीवर बसून लिहीतोस की घरी जाऊन लिहीणार?" मी म्हणालो, " घरी जाऊन लिहीणार." मग आप्पा म्हणाले, " सुरेश, तू लिहिलेलं पत्र मला दाखवणार? " मी हसतच म्हणालो, " आप्पा हे पत्र तुम्हीच पोस्टात टाकणार आहात!"  कराडपथावरून जाताना, आता मला गवसलेला पत्ररूपी ध्येयपथ माझ्या हाती लागला आहे आणि तो मला माझ्या उद्देशाकडे मायेने जवळ-जवळ  घेऊन चालला आहे असा विचार करीत-करीत मी घरी कधी पोचलो हे मलाच कळाले नाही. असीम आनंदात घरातील पुढील खोलीत चटई टाकून पत्र लिहायला बसलो. ब्रम्हांडातील सर्व शक्ती माझ्या मदतीसाठी धावून आल्या आहेत अशी दिव्य अनुभूती त्यावेळी मला झाली आणि त्या अदभुत शक्तींनीचं मला लिहीतं केलं...                "तिर्थरूप मामा यांना सुरेशचा सादर दंडवत! मामा, माझे जन्मगाव कराड हेच असून मी सध्या टिळक हायस्कूल येथे इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. परवा शाळेचा पहिला दिवस असतांना आमच्या श्री. एम.बी.जोशी सरांनी आम्हांला 1930 साली शाळेच्या पहिल्या दिवशी घडलेली घटना सांगितली. "मी यशवंतराव चव्हाण होणार " हे आपले उद्गार  ऐकून मी खूप भावनावश झालो. मामा, मला आयुष्यात एकदा आपणाला भेटून आपला आशिर्वाद घेण्याची इच्छा आहे.आपल्या दोन ओळींच्या शब्दांचे उत्तर मला आयुष्यभर प्रेरणा देईल." कळावे,                                                                                    आपला आदरणिय-                                          सुरेश माणिकराव रेपाळ. कराड.                                       हे पत्र वाचून घरातील सर्वजण एकदम खुष झाले! पत्रोत्तराच्या उत्सुकतेपोटी मी दुसर्या दिवसापासूनच संध्याकाळी दुकानात जाऊन बसू  लागलो. आप्पा-पापा माझी उत्सुकता जाणून होते.  आठव्या दिवशी शाळा सुटली...अन् अंतरंगी दैवी संदेश मिळाल्याच्या भावनेने मी घरी न जाता दप्तर घेऊनच थेट दुकानात गेलो.आप्पा माझी वाटच पहात होते ! यशवंतरावांचे पत्रोत्तर आले होते!!!  दुकानात पोचताच माझ्या हातातील दप्तराकडे पाहून मी शाळेतून घरी न जाता थेट दुकानात आल्याचे ओळखून आप्पा आश्चर्यचकित होत म्हणाले, " अरे सुरेश ये..ये. हे बघ यशवंतरावांचं पत्र आलंय तुला!! " मी आनंदाने आप्पांच्याकडून झटकन पत्र घेऊन गादीवर बसून वाचू लागलो..त्या पत्रात त्यांनी लिहीलं होतं...             " प्रिय सुरेश, तुझे पत्र मिळाले. ते वाचुन मला खूप-खूप आनंद वाटला. कराडहून पुष्कळ माणसे दिल्लीला मला भेटायला येतात त्यावेळीही असाच आनंद होतो.पण कराडच्या एखाद्या लहान विद्यार्थ्यानं किंवा मुलांनं असं पत्र लिहून पाठविलं की मला गहिवरून येतं.तू मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहेस ती भेट केंव्हातरी होईलच.तुला माझे संपूर्ण आशिर्वाद."     कळावे,            आपला - यशवंतराव चव्हाण.                                      आदरणिय यशवंतरावांचे हे पत्र वाचून घरातील सर्वजण आनंदले. दुसर्या दिवशी एम.बी.जोशी सरांनी ते पत्र वर्गात वाचुन दाखविले. नंतर सहा-सात महिन्यांनी मकर संक्रांतीचा सण होता या सणाचे निमित्त साधून मी अशाच आशयाचे दुसरे पत्र लिहिले व पत्रासोबत पाकीटातून तिळगुळ पाठविले. पुन्हा अशाच प्रचंड उत्सुकतेनंतर आठ-दहा दिवसांनी यशवंतरावांचे मला संक्रांतीचे आपुलकीचे शुभेच्छा पत्र आले !!  आपल्या पत्र संवादातूूून यशवंतरावांच्या भेटीचा समय समीप येत चालला आहे ही भावना  माझ्या मनात दृढ व्हायला लागली होती. हा संपूर्ण काळ माझ्यासाठी एकप्रकारे रोमहर्षक असाच होता.सण, जयंतीदिन या निमित्ताने मी हा पत्रसंवाद यापुढे अशाच रोमांचकारी अवस्थेत चालू ठेवला, यशवंतरावांची सहज सुंदर मजकूरात, आपुलकीच्या भावनेने लिहिलेली पत्रोत्तरे माझा आनंद द्विगुणीत करीत राहीली. आदरणिय यशवंतरावांच्या जीवनात 1981 साली सर्वात मोठी दु:खद घटना घडली, त्यांच्या पत्नी सौ. वेणूताई चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यशवंतराव खूपच निराश आणि एकाकी झाले. या दु:खद क्षणी मी त्यांना सांत्वनपर पत्र लिहिले. त्यांनी या पत्राचे सुध्दा मला उत्तर पाठविले. या उत्तरादाखल पत्रात ते लिहितात... प्रिय सुरेश यांस सप्रेम आशिर्वाद. माझी प्रिय पत्नी सौ. वेणूबाई हिच्या दु:खद निधनानिमित्त आपण पाठविलेला संदेश मिळाला. सौ. वेणूबाईंच्या जाण्याने जीवनात एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपणांसारख्या मित्रांच्या सांत्वनाने ही पोकळी भरून काढण्यास मदत होईल. कळावे, आपला-- यशवंतराव चव्हाण या अविस्मरणीय पत्र- संवादरूपी मार्गावरून पुढे - पुढे जात असतानाच एक दिवस माझ्या जीवनातील तो रोमहर्षक स्फूर्तीदायी प्रसंग अगदी जवळ आला!! आशेची विजयी पताका मला क्षणोक्षणी खूणावू लागली... 1982 साली विजयादशमी निमित्त मी यशवंतरावांना लिहिलेले सातवे पत्र निर्णायक ठरले !! किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला !! कारण या पत्रामुळेच मला यशवंतरावांचे अपाँइंटमेंट लेटर आले !!! असे काय लिहिले होते मी या पत्रात कि ज्यामुळे यशवंतरावांना मला भेटीचे निमंत्रण द्यावे वाटले? मी लिहिलेल्या या निर्णायक पत्राचा मजकूर असा होता... "तिर्थस्वरूप मामा यांना सुरेशचा सादर दंडवत! मामा , आज विजयादशमीचा सण आहे. या सणानिमित्त मी आपणाला हे सोने पाठवीत आहे त्याचा आपण आनंदाने स्विकार करावा. " सोनं घ्या सोन्यासारखं रहा !" " मामा, मी आज काही कामानिमित्त कराडहून इचलकरंजीला आलो आहे. आज हेच सोने जर मी कराडला माझ्या आजीकडे पाठविले असते तर ती काय बरं म्हटली असती? ती म्हटली असती, " माझ्या सोन्यानं सोनं पाठवलंय व्हय !! "     कळावे,                                                             आपला आदरणिय- सुरेश माणिकराव रेपाळ.                            मी यशवंतरावांना विजयादशमीचे सोने पाठविले आणि माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण अगदी उंबरठ्यानजीक येऊन ठेपला! कारण मला वरील पत्राचे उत्तर त्यांच्या भेटीच्या निमंत्रण स्वरूपात मिळाले !! यशवंतरावांच्या या पत्राचा मजकुर असा होता...       प्रिय सुरेश यांस सप्रेम आशिर्वाद.तुझ्या शुभेच्छा मिळाल्या. मी कांही कार्यक्रमानिमित्त कराडला पुष्कळवेळा येतो. कधीतरी मला भेट.      कळावे,        तुझाच यशवंतराव चव्हाण.    हे पत्र माझ्या हाती देत असतांना आप्पांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते.                   जीवनातील आनंदाच्या- सुखाच्या रम्य अशा हिंदोळ्यावर झोके घेत असतानाच 1982 साली मला यशवंतरावांचे भेटीचे निमंत्रण पत्र मिळाले, आता विश्वविधाताच जणू माझ्या पाठीशी उभा ठाकला होता! निसर्गातील दैवी शक्तिंनी मला अनुरुप अशा सर्व घटनांचे पुर्वनियोजन करून ठेवले असावे याची दिव्य अनुभूती मला क्षणोक्षणी व्हायला लागली होती. कराड येथील एक प्रतिष्ठित भांड्याचेे व्यापारी श्री.बंडोपंत मोहिरे हे यशवंतरावांचे लहानपणीचे जीवलग मित्र.त्यांचे सुपुत्र श्री.बाळासाहेब मोहिरे यांचा शुभ विवाह 1982 साली होता! सहाजिकच मोहिरे यांनी यशवंतरावांना लग्नाला आमंत्रित केले होते. कराड पेठेतील कापड व्यापारी या नात्याने श्री. मोहीरे आणि आमचा स्नेहसंबंध होता, त्यामुळे या लग्नाचे निमंत्रण आम्हालाही होते!                      मोहीरे यांच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मला आप्पांनी विचारले, " सुरेश, उद्या यशवंतराव चव्हाण साहेब लग्नाला येतील तू काय ठरवलं आहेस? तू कसा भेटणार त्यांना? मी म्हणालो , " आप्पा मी अजून काहीच ठरवलं नाही. तुम्हीच सांगा कसं भेटायचं ते?" मग आप्पांनी हसतच पण अतिशय गांभीर्यानं सांगितलं,          " सुरेश, बघितलसं, निसर्गाच्या गूढ शक्तीचं मोठं उदाहरण आहेस तू! इतकी वर्ष अगदी अंतःकरणापासून ज्या मोठ्या गोष्टीसाठी तू प्रयत्न केला आहेस, तो प्रसंग आता  दत्त बनून तुझ्यापुढे उभा आहे! मोहीरेंच्या लग्नाला मी जाण्याऐवजी तुझं जाणं महत्त्वाचं झालं आहे, लग्न उद्या संध्याकाळी 5:15 वाजता आहे. यशवंतरावजी येणार आहेत. खूप-खूप मोठी लोकं येणार असतील. तू आहेस 19 वर्षांचा मुलगा. तू असं कर, यशवंतरावांचं शेवटचं निमंत्रणाचं पत्र घेऊन अर्धा तास अगोदरच लग्नाला जा. इतर कुठल्याही व्यक्तीला ते पत्र दाखवू नको. तूला यशवंतरावांचे पी.ए. ( Personal Assistant ) कोण आहेत माहीती आहे का? " मी म्हणालो, " होय आप्पा, मला माहिती आहेत, त्यांचं नाव आहे श्रीपाद डोंगरे साहेब. मी कधीतरी रविवारी सिनेमा बघायला राॅयल थिएटरला गेलो की, सिनेमा सुरू होण्यापूर्वी वार्ताचित्र ( भारतीय न्यूज ) दाखवतात त्यामध्ये विमानातून उतरताना इंदिराजी , यशवंतरावजी आणि त्यांच्या मागे श्रीपाद डोंगरे साहेब मी पाहिले आहेत कारण तसाच फोटो दुसर्या दिवशीच्या ' सकाळ ' वर्तमानपत्रात नावानिशी आलेला मी पाहीला आहे. " आप्पा म्हणाले , " शाब्बास!!, लग्नाची वेळ संध्याकाळची असल्यामुळं यशवंतरावांचा कराडला मुक्काम असणार. डोंगरे साहेब लग्नात दिसताच वेळ प्रसंग पाहून त्यांना भेटून ते पत्र दाखव. पत्र पाहीलं की ते तुझी नक्की यशवंतरावांशी भेट घडवून आणतील. आणि जर लग्नात डोंगरे साहेब भेटले नाहीत तर तू लग्न झाल्यावर थेट यशवंतरावांच्या ' विरंगुळा ' निवासस्थानी जाऊन त्यांना भेट. उद्या तुला यशवंतराव नक्की भेटतील!"                          आप्पांनी दिलेला यशवंतरावांच्या भेटीचा मंत्र अगदी तंतोतंत खरा ठरण्याची सुरुवात झाली! मी अत्यानंदाने दुकानातून घरी पोचलो. त्या दिवशी रात्रीच्या स्वप्नांतही स्वप्नं पडत होती! चार वेळा एकदा स्वप्नात आणि एकदा वास्तवात दचकून जागा झालो! अर्थातच ही सर्व स्वप्ने यशवंतरावांच्या भेटीची होती! ही सर्व स्वप्ने साकारणार्या वास्तवातील पहाटेचा उदय होताच मी भेटीत काय आणि कसं बोलायचं याच्या सरावापासून ते अगदी कपडे इस्त्री करण्यापर्यंत सर्व तयारी चालू केली.                     आज दुपारपासूनच कराड पेठ गर्दीनं फुललेली होती. त्या काळात कराडला महाराष्ट्राची राजकीय पंढरी म्हणून ओळखत असत. महाराष्ट्राच्या या राजकीय पंढरीचा विठ्ठल आज त्याच्या माहेरी साक्षात अवतरणार होता! छान पांढरे स्वच्छ कपडे परिधान करून मोठ्या आनंदात मी दुपारी साडे चार वाजता यशवंतभेटीच्या वारीत सामील होण्यासाठी घराबाहेर पडलो. खरेच आज मला निसर्गातील कणकण गंधीत झाल्यासारखा भासत होता! आणि मधूनच मी पँटच्या उजव्या खिशाला हात लावून निमंत्रण पत्र घेतले असल्याची खात्री करून घेत होतो! मोहीरे यांच्या घरापासून साधारणपणे 300 मीटर पर्यंतचा रस्ता लाल पायघडयांनी सजला होता. मी कच्छी चौकातील रमेश स्टोअर्स या पुस्तकाच्या दुकानाच्या पायरीवर उभा होतो. अनेक क्षेत्रातील शेकडो प्रसिध्द आणि प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती पाहून माझ्या मनावर थोडे दडपण आले होते. बरोबर पाच वाजता आदरणिय यशवंतरावांची दर्शनी छोटासा तिरंगा लावलेली काळी गाडी कच्छी बिल्डिंग नजीक येऊन उभी राहिली. सात वर्षांपासून ज्यांच्या भेटीची आस लावून बसलो होतो ती थोर व्यक्ती हजारो मैलांच अंतर कापून माझ्यापासून अगदी दहा फुटाच्या अंतरावर अवतरली होती! माझ्या आणि त्यांच्यातील हे अंतरसुध्दा कमी होण्यासाठी आता अजून फक्त कांही क्षणांचेच अंतर बाकी उरले होते! यशवंतरावांची गाडी थांबताच ड्रायव्हरने गाडीचे दार उघडले आणि यशवंतराव गाडीतून उतरताच मोहीरे आणि त्यांच्या नातलगांनी हसतमुखाने, अतिशय आनंद-आदराने त्यांचे स्वागत केले. यशवंतरावांनीही प्रसन्नतेनं नमस्कार करीत सर्वांच्या स्वागताचा स्विकार केला. हे सर्व दृश्य मला स्वप्नवत वाटत होते. पहिल्यांदाच मी यशवंतरावांचे उत्तुंग व्यक्तिमत्व एवढ्या जवळून पाहीले आणि मला माझे जीवन धन्य झाल्यासारखे वाटले!                           लाल पायघडयांवरून सर्वात पुढे मधोमध यशवंतराव आणि त्यांच्या पाठीमागे शेकडो आमंत्रित, पै-पाहुणे लग्न मंडपाकडे जाऊ लागताच मी सुध्दा त्या गर्दीत सहभागी होऊन पुढे-पुढे जाऊ लागलो. एखादा राजासुध्दा उणा पडेल असे यशवंतरावांचे त्यावेळचे ते रूबाबशिर चालणे आजही माझ्या स्मरणात आहे. लग्न समारंभात हजारोंची गर्दी असल्याने मला तिथे यशवंतरावांची भेट घेता येणे शक्य नव्हते म्हणून मी, पाचव्या मंगलाष्टकाच्या आरंभीचा "आली लग्न घटिका.." हा ब्राम्हणाचा स्वर ऐकताच , आता माझ्या जीवनातील सुद्धा सर्वात शुभ घटिका समीप आल्याचे ओळखून हातातील उरलेल्या अक्षता टाकल्या आणि यशवंतभेटीला जाण्यासाठी माझी पाऊले यशवंतरावांच्या निवासस्थानाकडे वळली !! " विरंगुळा " या यशवंतरावांच्या निवासस्थानी जात असतांना मी आनंदाने भान हरपून गेलो होतो. मनाच्या गाभार्यातून हळू-हळू पूर्व स्मृती जाग्या होऊ लागल्या होत्या..ह्रदयाच्या ठोक्याबरोबरच या स्मृतीनादाने जणू ताल धरला होता.." सुनले बापू ए पैगाम..मेरी चिठ्ठी तेरे नाम..चिठ्ठीमे सबसे पहले लिखता तुझको राम-राम, लिखता तुझको राम-राम.." बालपणी आईच्या मांडीवर बसून पाहिलेल्या या गीतातील चिठ्ठी किंवा पत्र लेखन हे माझ्या स्मृतीपटलावर बालपणीच कुठेतरी विसावले आणि या विसाव्याची खरी परिभाषा पत्रलेखनाद्वारेच साक्षात यशवंतरावांच्या आशीर्वादाने उमजावी हे सर्वकांही अगम्य आणि अदभुत असेच होते!! अशा अदम्य उत्साहात कांही क्षण चालत -धावत पुढे-पुढे जात असतानाच मला दुरूनच " विरंगुळा " ही अक्षरे दिसली आणि माझा  ह्रदयभाव सहजतेनं मुखी आला... मी उत्स्फूर्तपणे त्या मानवतेच्या मंदिराला साद घातली... " मामा...मी आलो मामा..."   रस्ता गर्दीने तुडुंब भरलेला..दुतर्फा गाड्यांचा ताफा...या गर्दीतून घुसत - घुसत कशीबशी वाट काढीत मी " विरंगुळा " निवासस्थानाच्या वेटींग रुमपर्यंत पोचलो. बाहेर यशवंतरावांची गाडी उभी होती. वेटींग रूममध्ये  राजकीय, सामाजिक, उद्योग, साहित्यिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठितांची मांदियाळीच अवतरली होती जणू! आणि मी 19 वर्षांचा मुलगा पँटच्या खिशाला वारंवार चाचपित पत्राची खात्री करून घेत उभा होतो. अशीच दोन-चार मिनिटे गेली आणि पहातो तर काय? यशवंतरावांचे पी.ए. श्रीपाद डोंगरे साहेब आतून बाहेर येत होते!! त्यांना पहाताच तडक त्यांच्याकडे जाण्यासाठी मी गर्दीतून पुढे सरसावलो. डोंगरे साहेबांचे लक्ष माझ्याकडे गेले, मी त्यांच्या जवळ पोचलो आणि खिशातील यशवंतरावांचे पत्र त्यांच्या हाती देत त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो, " मी साहेबांना नेहमी पत्र लिहीतो. या पत्रात त्यांनी मला भेटायला बोलावले आहे. मला पाचच मिनिटे वेळ मिळेल का?" श्री.डोंगरे साहेबांनी अशा गर्दीतच उत्सुकतेने ते पत्र वाचले आणि म्हणाले, " तुझे नाव सुरेश काय? अरे तुझ्याकडे साहेबांचे पत्र आहे. तुझी आताच भेट होऊ शकते! आम्ही आता एका दुसर्या कार्यक्रमासाठी बाहेर निघालो आहोत, ड्रायव्हरला तशी सुचना देण्यासाठी मी बाहेर आलो आहे. तू पत्र माझ्याकडे दे मी ते साहेबांना दाखवतो मग ते तुला आत बोलावून घेतील किंवा बाहेर जाताना इथेच तुझी भेट घेतील. तू इथंच थांब." डोंगरे साहेब ड्रायव्हरला सांगून पुन्हा आत ऑफिसकडे गेले!! माझे सर्व दडपण, भीती एकदम नाहीशी झाली. आता मी संकटप्रसंगी भारताचे प्रतिक असलेल्या हिमालयाचं संरक्षण करणार्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीना भेटण्यासाठी सज्ज झालो होतो!आणि काही सेकंदातच श्री.डोंगरे साहेब वेटींग रूममध्ये आले आणि त्यांनी मला हातानेच ' थांब तिथेच ' असे खुणावले...एव्हांना सर्वांनाच यशवंतरावजी येण्याची चाहूल लागली होती...सर्वांची उत्कंठा शिगेला पोचली होती आणि क्षणभरातच अतिशय धीर-गंभीर पाऊले टाकत, स्मित हास्य करीत यशवंतरावांचे वेटींग रूममध्ये आगमन झाले आणि क्षणार्धात सगळया वातावरणात चैतन्य पसरले. माझ्या मनमंदिरातील देवता माझ्या समोर साक्षात उभी होती!! उपस्थितांमधील कोणी त्यांना नमस्कार करीत होते तर कोणी हस्तांदोलन करताना दिसत होते. प्रत्येकजण काही बोलण्याचा प्रयत्न करीत होता. यशवंतराव प्रत्येकाची विनयशीलतेनं, आपुलकीनं विचारपूस करीत होते. हे सर्व अविस्मरणीय दृश्य मी वेटींग रूमच्या उंबरठ्यानजीक उभे राहून डोळ्यांत प्राण आणून पहात होतो. यशवंतरावांची लिनता, शालिनता पाहून असे वाटले की, जर शब्दांत जीव असता तर काय बहार झाली असती "विनम्रता" हा शब्द सुध्दा नम्रतेची खरी अनुभूती घेण्यासाठी यशवंतरावांच्या सहवासात आला असता!!!  उपस्थितांना भेटता-भेटता यशवंतरावांनी अचानक वळून डोंगरे साहेबांना विचारले, " कुठं आहे तो मुलगा?" डोंगरे साहेबांनी लगेच माझ्याकडे बोट दाखवित सांगितले," तो काय बाहेर चौकटी जवळ उभा आहे." सगळ्या  लोकांनी " कोण आहे हे पोरगं?" अशा विस्मयजनक नजरेनं माझ्याकडे पहात मला वाट करून दिली. यशवंतराव मला पहाताच छान हसले आणि म्हणाले, " ये ईकडे " मी धावतच त्यांच्याकडे गेलो आणि खाली वाकून नमस्कार केला. आणि उभे रहात म्हणालो, " मामा , माझं नाव सुरेश माणिकराव रेपाळ. " नाव सांगताच यशवंतरावांनी अतिशय प्रेमाने माझ्या खांद्यावर हात टाकून मला जवळ घेतले आणि म्हणाले, " सुरेश...नाव काय सांगतोयस सुरेश, किती छान पत्र लिहीतोस तू! तुझी पत्र मला खूप आवडतात रे. न विसरता मला भेटायला आला आहेस, मला किती बरं वाटतयं!! चल.." असे म्हणताच आम्ही चालत बाहेरच्या दरवाजा जवळ आलो.तिथे आम्ही समोरासमोर ऊभे राहताच त्यांनी उजवा हात माझ्या डाव्या खांद्यावर टाकला आणि हलकेच खांदा चेपीत, किंचीत मान तिरकी करीत मला म्हणाले, "सांग सुरेश कसा आहेस " मी म्हणालो, " मामा, मी छान आहे." मला आणखी बोलायचं आहे हे ओळखून त्यांनी मानेनंच होकार दिला. मी म्हणालो, " काही नाही मामा , मला फक्त आपला आशिर्वाद हवा आहे. " यशवंतरावांनी माझी आशिर्वादाची इच्छा ऐकली. आणि क्षणभर थांबून विषय बदलत मला म्हणाले, " सुरेश, मला तुझ्याशी खूप बोलायचं होतं पण आम्ही आता एका दुसर्या कार्यक्रमासाठी निघालो आहे. आणि उद्या पहाटे लवकर दिल्लीला जाणार आहे. मी पुन्हा कराडला आलो की तू ये. आपण खूप बोलू. तू आशिर्वाद मागतो आहेस..." असा संवाद चालू असतानाच त्यांना गर्दीची जाणीव होऊ लागली. आणि मला " इथेच थांब " असं म्हणाले. मी उंबरठ्यानजीक थांबलो आणि यशवंतराव दोन पायरी खाली उतरून गर॔कन माझ्याकडे वळले आणि पुन्हा माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले," सुरेश, आशिर्वाद मागतो आहेस खरा पण जीवनातलं एक कटुसत्य ध्यानात ठेव, केवळ कोणाच्या आशिर्वादानं माणूस मोठा होत नाही रे. त्यासाठी कष्ट करावं लागतं, मग ते क्षेत्र कुठलंही असू देत, मन लावून, जीव ओतून काम कर यश तुझंच आहे. असं सांगून खांद्यावर हात फिरवित " यशस्वी भव: आशिर्वाद आहेच, थोडासा आशिर्वाद इतरांसाठी राखून ठेव..." असा आशिर्वाद दिला. आणि ड्रायव्हरने गाडीचे दार उघडले. गाडीत बसताच एवढ्या मोठ्या गर्दीत फक्त माझ्याकडे पहात त्यांनी बाय-बाय केले आणि गाडी पुढील कार्यक्रमासाठी निघून गेली!!                                              कातळाखालचा झरा एकदम उसळून वर यावा तसे माझ्या सर्वांगात स्फूर्तीदायी आनंदाचे शहारे उसळून वर आले होते! मला चंदनाचा परीसस्पर्श झाला होता...निदान त्याचा गंध तरी लाभावा या भावनेने तिथे आलेल्या माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या व्यक्तींनी नंतर अक्षरशः मला घेरले. अनेकजण प्रश्न  विचारीत होते, " यशवंतरावांनी तुला काय सांगितलं? तुझी अगोदर ओळख होती का? तुझे त्यांच्याकडे काय काम होते? प्रत्येकाच्या प्रश्नाला मी आनंदाने उत्तरे देत होतो.कोणी मला हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करीत होते तर कोणी माझ्या पाठीवर हात कुरवाळत पुढे जात होते! माझ्यासाठी हा अनुभव अदभुत असाच होता. "अणुरूपाने परमात्म्याला भेटून मागे यावे " अशा कृतज्ञतापूर्वक भावनेने वंदन करीत मी " विरंगुळा " निवासस्थानाचा निरोप घेऊन बाहेर आलो.                              यशवंतरावांच्या काही क्षणांच्या सहवासात मला आयुष्य पावन झाल्यासारखे वाटत होते. मन अत्यानंदाने गहिवरले होते. यशवंतरावांच्या भेटीचा प्रसंग घरी सांगण्यासाठी मन इतके आतुरलेले होते की मला पंख असते तर किती बरे झाले असते मी घरी झटकन पोचलो असतो असे वाटत होते! घरी पोचताच पहातो तर काय! पहिल्या खोलीतच माझी सर्व बहीण-भावंडे अक्षरशः माझी वाट पहात थांबली होती! माझा आनंदी चेहरा पहाताच त्यांनी भेट झाली आहे हे ओळखून एकच जल्लोष केला. मी म्हणालो, " चला आईला, तुम्हांला सगळी हकीकत सांगतो. आणि काय आश्चर्य माडीवरुन जात असताना सगळ्यांनी एकाच स्वरात आईला माझ्याप्रमाणे हाक दिली!! " " आई-माता-जननी मी आलो....!!!" सर्वांची अशी एकसाथ हाक ऐकून आई आणि आप्पा सुध्दा आनंदाने धावत आले. आई-आप्पा म्हणाले, "सुरेश भेटलास का यशवंतराव चव्हाण साहेबांना?" त्यांवर माझ्या अगोदरच सर्व भावंडांनी " हो " म्हणीत होकार दिला. आप्पा म्हणाले, " चला, सगळेजण पुढच्या खोलीत बसू या. तिथे सगळी हकीकत सांग." आई-आप्पांसह सर्व भावंडे माझ्या समोर बसली. आणि मी उभा राहून मोठ्या आनंद-आवेशात मोहीरेंच्या लग्नापासून एक-एक प्रसंग, मोरपिसारा हळूवारपणे उलगडावा त्याप्रमाणे सांगू लागलो, सगळेजण थक्क होऊन ऐकू लागले आणि शेवटी यशवंतरावांच्या भेटीचा प्रसंग सांगत असताना मला गहिवरून आले,आई-आप्पांसह  सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू आले होते. पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी आल्यानंतर घरातील लहान-थोर त्या व्यक्तीला साक्षात विठ्ठलाचे घरी आगमन झाले या भावनेने नमस्कार करतात अगदी तसेच ही हकीकत ऐकून उत्स्फूर्तपणे उठून सर्व भावंडांनी मला नमस्कार केला. " विरंगुळा " या यशवंतरावांच्या निवासस्थानी                    ( यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान क्रमांक:2. ) त्यांच्या जगभरातील लाखोंच्या पत्र संग्रहात माझ्या पत्रांचा समावेश करण्यात आला आहे हे मी माझे परमभाग्य समजतो.                                                    यशवंतरावांची जीवन कहाणी, पत्र संवाद, आणि  त्यांची भेट या सर्व गोष्टीतून बोध घेऊन मी घडलो. ऐन तरुण वयात मोठा संघर्ष करावा लागला. या सर्व अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांवर मात करून पुढे जाण्याची ताकद लहानपणीच यशवंतरावांच्या जीवन कहाणीतून मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.आता मी जरी साठीचा झालो असलो तरी पाठीच्या अनुभवांतून मनाने एवढा कणखर आहे की, आजही मी पंचविशीच्या हिंदोळयावर झोके घेत असल्याच्या आनंदात असतो. जीवनाच्या या टप्प्यावर कधीतरी स्मृतींचा kaleidoscope ( त्रिकोनी आकाराचे अर्धा फूट लांब आकाराचे शोभादर्शकयंत्र यात कडेला आरसे बसविलेले असतात व बांगडीचे निरनिराळ्या रंगाचे तुकडे आत टाकलेले असतात आपण जसे गोलाकारात फिरवू तसे त्यामध्ये तुकड्याच्या विविध मनोहारी आकृती दिसतात.) गोलाकार फिरवित पहाताना  सुख-दु:खाच्या अनेक तुकड्यांनी एकत्र येऊन बनलेल्या 'आनंदमयी प्रसंगांच्या ' सुंदर निर्मितीचे विहंगम दृश्य दिसते आणि म्हणूनच कि काय, एवढ्या सुख - दु:खानंतर आजही मला पुन्हा-पुन्हा वाटते की, " हे जीवन किती सुंदर आहे, फिरूनी मज पुन्हा मानवजन्मच लाभावा!"  आदरणिय यशवंतरावांशी केलेल्या पत्र संवादातून प्रेरणा घेऊन मी भारतातील इतर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना पत्र लिहून संवाद साधला. यामध्ये उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, माजी राष्ट्रपती झैलसिंग , माजी उपराष्ट्रपती बी.डी.जत्ती , सुपरस्टार अमिताभ बच्चन, कवी कुसुमाग्रज, कवयित्री इंदिरा संत, कवयित्री शांता शेळके, गायक सुधीर फडके,विनोदी लेखक पु.ल.देशपांडे, प्रतिभावंत अभिनेत्री स्मिता पाटील, बुद्धीबळपटू भाग्यश्री साठे, व.पू. काळे, कवी मंगेश पाडगावकर इत्यादींचा समावेश आहे.          आत्मकथनाचा  सारांश आणि उद्देश- परिस्थिती कितीही कठीण असली, प्रतिकूल असली तरी शिक्षण आणि जीवनातील अनुभवातून माणूस त्यावर  मात करून आपले ध्येय गाठू शकतो हे आपणाला यशवंतरावांच्या जीवनातून शिकायला मिळते. आयुष्यात कधीतरी आदरणिय यशवंतरावांना भेटून त्यांचा आशिर्वाद घ्यायचा ही माझी लहानपणीची इच्छा पत्र लेखनाच्या माध्यमातून साध्य झाली. यावरूनही हेच सिद्ध होते की आपल्या दुर्दम्य ईच्छाशक्तीने आपण कोणतेही अशक्य कार्य शक्य करू शकतो मग परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल! माझे हे आत्मकथन हा सुध्दा सृष्टीचा एक पूर्वनियोजित अविष्कार आहे असे मी मानतो. माझे आत्मकथन नवीन पिढीला मार्गदर्शक ठरावे, त्यांनी यातून प्रेरणा घेऊन जीवनात उत्तुंग यश संपादन करावे आणि आपले व आपल्या देशाचे नाव जगात मोठे करावे हाच माझ्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.                                                            " माणूस केवळ कोणाच्या आशीर्वादाने मोठा होत नाही, तर तो आपल्या कर्तृत्वाने आणि चांगल्या कर्माने मोठा होतो, असामान्य होतो " हा यशवंतरावांचा संदेश माझ्यासाठी गीतेतील पवित्र अशा ओवीसमान आहे. म्हणूनच मला हे आत्मकथन गीतेएवढे प्रिय आहे, आज मी ही आत्मकथनरूपी गीता उदयोन्मुख पिढीला त्यांच्या जीवनातील संपूर्ण यशस्वितेसाठी अतिशय विनम्रपणे समर्पित करीत आहे!" धन्यवाद!! जयहिंद!! जय महाराष्ट्र!!

       

 🇮🇳

       

  👇🙏माझे आत्मकथन आपल्या प्रियजनांना जरूर पाठवावे ही नम्र विनंती!👇

       

 Happy & Positive

       

  Have A Nice Day

         
           

          
         
                     


         
            -----------            
       
     
     
   
     
        Good Morning Wishesh





























































Good Morning Wishesh